जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीपदी राजु ग्यानोबा गायकवाड
लातूर : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर येथील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या पदावर कार्यरत असलेले राजु गायकवाड यांची लातूरच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीपदी नुकतीच प्रतिनियुक्ती राज्यशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार दिव्यांग कल्याण विभाग हा स्वतंत्र निर्माण करण्यात आला आहे. राज्यस्तरावर दिव्यांग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती सन 2000 साली झाली असून तब्बल 25 वर्षानंतर जिल्हास्तरावर स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हास्तरावरील कामकाज सद्यस्थितीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत हाताळण्यात येत आहे. दिव्यांग कल्याण विभागाची जिल्हास्तरावरील कार्यालय सुरू करणे आवश्यक असल्याने तसेच क्षेत्रीय स्तरावरील कामकाज सक्षमपणे हाताळण्यासाठी अनुभवी अधिकारी/कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने राज्यातील 05 जिल्हयात प्रातिनिधीक स्वरूपात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून यात राजु ग्यानोबा गायकवाड यांची प्रतिनियुक्ती लातूर जिल्हयासाठी करण्यात आली आहे. लातूरसह अहिल्यानगर, सातारा, धाराशिव व जळगाव या जिल्ह्यात जिल्हा सक्षमीकरण अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्रपणे जिल्हास्तरावर निर्माण केल्यामुळे शासनाचे आभार राजु गायकवाड यांनी मानले. या निवडीबद्दल समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह समाज कल्याण विभागातील अधिकारी,कर्मचारी यांनी स्वागत केले आहे.
0 Comments