भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास सुरुवात
लातूर : अनुसुचित जाती, अनुसुचित जनजाती आणि इतर दुर्बल घटकांतील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी दि. 08 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयात समता सप्ताहाचे उदघाटन संविधान उद्देशिकाचे वाचन करून मंगळवारी करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजु गायकवाड, सहायक लेखाधिकारी संजय भाले, समाज कल्याण निरीक्षक विक्रम जाधव, लिपीक शिवराज गायकवाड, प्रशांत चामे, रामनारायण भुतडा, राजकुमार पवार, बालाजी बनसोडे, गणेश पाटील, प्रदीप समुद्रे, ज्ञानेश्वर राव आदी उपस्थित होते.
हा सप्ताह 14 एप्रिलपर्यंत चालणार असून समाज कल्याण विभागातील सर्व दिव्यांग शाळा, अनुसुचित जातींच्या आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये राबविला जाणार आहे. यात भारतीय संविधानाची उद्देशिका/प्रस्ताविका यांचे वाचन करणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाटय स्पर्धा, पथनाटय, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान इ. उपक्रम राबविले जाणार आहेत. यासह दि. 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करणे. तसेच महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती देण्यात येणार आहे. यासह जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर, मेळावा आयोजित केला जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती या सप्ताहा दरम्यान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. जिल्हयातील विविध दिव्यांग शाळा, अनुसुचित जातींच्या आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये या सप्ताहाला सुरूवात झाली असून या सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले आहे.
0 Comments