ताजपुर पाटी महामार्गावर काळविटाचा दुर्दैवी मृत्यू ; हरणांच्या मृत्यूची मालिका सुरूच
निटूर : दि. २२ एप्रिल – निलंगा तालुक्यातून जाणाऱ्या लातूर–जहीराबाद महामार्गावर ताजपुर पाटी येथे एक काळवीट मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर काळवीट अर्धवट अवस्थेत मृतावस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले आढळून आले. गेल्या वर्षभरात या महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या हरिणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही मालिका काही केल्या थांबत नाहीये. सध्या उन्हाळ्याचे तीव्र चटके जाणवत असून तापमान ४० अंश सेल्सिअस पार करत आहे. या प्रखर उष्णतेमुळे जंगलातील प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे स्थलांतर करत आहेत. निलंगा तालुक्यातील केळगाव, लांबोटा, निटूर, खडक, उमरगा, शिरोळ वां., ताजपुर, हडगा, उमरगा गौर, मसलगा या भागांत मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असून येथे हरणांचा वावर आहे.
मात्र या जंगलांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने हरणांना जीव मुठीत घेऊन रस्ते ओलांडावे लागत आहे. परिणामी, वाहतुकीच्या वाढत्या दणक्यात हे मुक प्राणी वाहनांच्या आघाताने मृत्युमुखी पडत आहेत. ही केवळ प्राणीहानी नसून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक हानी आहे. दुर्दैवाने वनविभाग आणि प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करून जंगलात पाणवठे, पाझर तलावांची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा हरणांच्या मृत्यूची ही मालिका थांबेल, असे वाटत नाही.
सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात वन क्षेत्रातून बाहेर येत आहेत, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. वन विभागाने वन क्षेत्रात नव्या पानवट्या तयार करून पाण्याची उपलब्धता केली, तर अशा दुर्दैवी घटनांमध्ये निश्चितच घट होईल. त्यामुळे प्रशासनाने पाजर तलाव व पानवट्यांच्या निर्मितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
-जावेद मुजावर
0 Comments