शाळेची घंटा रविवारीही वाजली; श्रीकृष्ण विद्यालयातील माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात पार
धाराशिव : दि. 21 एप्रिल - रविवारी असूनही शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी शाळेत आले आणि प्रार्थनाही भरली. क्रीडाशिक्षकांच्या पहाडी आवाजात "सावधान - विश्राम" ही आज्ञा ऐकू आली आणि राष्ट्रगीत सुरू झाले. ही हृदयस्पर्शी घटना घडली गुंजोटी येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या श्रीकृष्ण विद्यालयात, जिथे 1999 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांचा स्नेहमेळावा रविवार, 20 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.-जणू काही कालच शाळा सोडली होती अशा भावनेने, 25 वर्षांनंतर या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेचा परिसर गजबजून टाकला. शाळेचे गेट पुन्हा ओळखीच्या चेहऱ्यांनी भरले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. उशिरा येणाऱ्यांना दरवाजाबाहेर थांबवलं गेलं आणि पुन्हा एकदा शिस्तबद्धपणे सावधान, विश्राम, राष्ट्रगीत – या सर्व गोष्टींनी वातावरण भारावून गेलं.
दहावीची 1999 ची बॅच ही शाळेतील सर्वात हुशार बॅच मानली जाते. या बॅचचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत आहेत – काही परदेशात नोकरी करतात, काही सैन्यात, काही शिक्षक, डॉक्टर, अभियंते, पत्रकार, वकील, शैक्षणिक संस्था चालक, उद्योजक तसेच यशस्वी शेतकरी देखील आहेत. या स्नेहमेळाव्यात शाळेचे मुख्याध्यापक अजय गायकवाड, उपमुख्याध्यापक रविराज पाटील, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता गायकवाड, पर्यवेक्षक भालेराव, संस्था समन्वयक घोडके, शिक्षक करपे, वाय. डी. जाधव, हडपद, भालेराव, आगाशे, जीवन चव्हाण, खंडू शाईवाले, साखरे, शहाणे, सुधाकर यादव, पुरी मामा, सगर, मार्डीकर, सुरेखा, हडपद, पुरी बाई आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नेताजी जाधव व सायली शहा यांच्यासह संदीप खमितकर, अनिल चौधरी, शिवाजी चव्हाण, सुवर्णा जगताप, अनुपमा चव्हाण, अश्विन देशमुख, संगमेश्वर रेड्डी, अतुल शिवनेचारी, महेश देशमुख, विनोद घोडके, पवन मोहरीर, प्रवीण शिंदे, अश्विनी जाधव, शुभांगी खजुरे, बेबी बोळे, वर्षाराणी पाटील, वैशाली शहाणे, उमा जाधव, शिवनंदा माने, दिपाली शिंदे, सुप्रिया झिंगाडे, कविता पुरी, मनोज इबत्ते, संजय कांबळे, अंकुश निकम, वसंत पवार, अमोल पुरी, अनिल कुलकर्णी आणि जीवन दूधभाते यांचाही सहभाग होता.
स्नेहमेळाव्याची सुरुवात मुख्याध्यापक अजय गायकवाड यांच्या प्रस्तावनेने झाली. सूत्रसंचालन प्रसिद्ध व्याख्याते व प्रवचनकार सतीश हाणेगावे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषद शिक्षिका सुवर्णा जगताप यांनी मानले. शाळेचे संस्थापक आधारवड, प्रख्यात सर्जन डॉ. दामोदर पतंगे यांची उपस्थिती स्नेहमेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विभावरी शाईवाले आणि उपाध्यक्ष प्रभाकर राव हिरवे यांनी स्नेहमेळाव्यास शुभेच्छा दिल्या. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात राष्ट्रगीत, प्रार्थना, परिचय, सत्कार, भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला.
0 Comments