चार घरफोडी उघडकीस; विवेकानंद चौक पोलिसांच्या कारवाईत १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून अंदाजे २ तोळे सोनं, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात रात्रीच्या वेळी घराचे कोंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपास दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे महाडा कॉलनीतून दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
तपासात आरोपींनी आपली नावं सुशांत शिवाजी गायकवाड (२६, रा. महाडा कॉलनी, लातूर) व कृष्णा ऊर्फ किरया गुंडेराव लोंढे (२२, रा. महाडा कॉलनी, लातूर) अशी सांगितली. अधिक चौकशीत त्यांनी विवेकानंद चौक परिसरातील विविध ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ऐवज – सोनं, चांदी व रोख रक्कम – गायकवाडच्या घरातून जप्त करण्यात आला. सदर मुद्देमाल विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या कुशल नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे, पोलीस अंमलदार खुरम काझी, यशपाल कांबळे, गणेश यादव, रवी गोंदकर, रणवीर देशमुख, आनंद हल्लाले, संजय बेरळीकर, महारुद्र डिगे, रमेश नामदास, अनिता सातपुते, दीपक बोन्दर आदींनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दाखवलेली दक्षता, तपास कौशल्य आणि पथकाचे उत्तम समन्वय यामुळे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून, शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची आणि उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
0 Comments