फक्त २४ तासांत शास्त्रोक्त तपास करून खुनातील दोन्ही आरोपी गजाआड – MIDC पोलिसांची प्रभावी कारवाई
लातूर : १४ मार्च रोजी हरंगुळ रेल्वे स्टेशनसमोर पाणीपुरी विक्री करणाऱ्या मनिष रुपसिंग पाल (वय २०, मूळ राहणार घिलौर, ता. नंदीगाव, जि. जालौन, उत्तर प्रदेश) याचा दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करून खून केला. त्याच्याकडील मोबाईल व पैसे लुटून आरोपी फरार झाले. या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८२/२०२५ नोंदवण्यात आला. कलम १०३(१), ३११, ३(५) भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल होताच, पोलीस उपविभागीय अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करण्यात आली.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे आणि शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत, २४ तासांच्या आत आरोपी दत्ता संजय ढोरमारे (वय २०, रा. पटेल नगर, लातूर) आणि आयान अब्दुल शेख (वय २०, रा. कपिल नगर, लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सहायक पोलीस निरीक्षक द्रोणाचार्य नेटके, उपनिरीक्षक मोरे, राजपूत, तसेच पोलीस अंमलदार बेल्लाळे, जगताप, दामोदर मुळे, कांबळे, भोसले, प्रशांत ओगले, राजू मस्के, साखरे, माने, सोनकांबळे, वायगावकर, बुजारे, वाहुळे, जाधव, महिला पोलीस अमलदार चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
0 Comments