भिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला २४ तासांत अटक – औसा पोलिसांची तत्पर कारवाई
औसा: दि. ४ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री औसा शहरातील एका दुकानासमोर झोपलेल्या भिकाऱ्याच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सदर भिकारी गंभीररीत्या भाजला असून, त्याच्यावर औसा व लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर भिकाऱ्याने दिलेल्या जबाबावरून ५ मार्च रोजी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे योगेश सिद्राम बुट्टे (वय ३५, रा. अन्नपूर्णा नगर, औसा) या आरोपीला ७ मार्च रोजी त्याच्या राहत्या घरी अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने भिकाऱ्याने शिवीगाळ केल्याच्या रागातून त्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले. औसा पोलिसांनी केवळ २४ तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, सहाय्यक फौजदार कांबळे, पोलीस अंमलदार गुट्टे, रतन शेख, समीर शेख, मुबाज सय्यद, बालाजी चव्हाण, पडीले आणि गोमारे यांनी केली.
0 Comments