Latest News

6/recent/ticker-posts

निटूरमध्ये शोले स्टाईल आंदोलन; पाणीपुरवठा न झाल्यास ३ एप्रिलला रास्ता रोको व गावबंद

निटूरमध्ये शोले स्टाईल आंदोलन; पाणीपुरवठा न झाल्यास ३ एप्रिलला रास्ता रोको व गावबंद


निटूर : येथे तीन वर्षांपासून रखडलेली पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करावी तसेच खोदकामानंतर रस्त्यांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी शोले स्टाईल आंदोलन केले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. येत्या ३ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास रास्ता रोको व गावबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

गावातील प्रत्येक घरात शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी १० कोटी रुपयांची योजना मंजूर केली होती. मात्र, कंत्राटदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्याप ही योजना कार्यान्वित झालेली नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करून पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र, कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सरपंच प्रतिभा अनिल सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

गावात पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाइनसाठी अनेक रस्ते खोदण्यात आले. मात्र, नंतर रस्त्यांचे पुनर्बांधकाम न केल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यांवर चालणेही मुश्किल झाले आहे. आज झालेल्या आंदोलनात प्राचार्य अनिल सोमवंशी, सरपंच प्रतिभा अनिल सोमवंशी, उपसरपंच शिवराज सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, दिनकर कवडे, श्रावण शिंदे, शिवाजी बाबर, शिवाजी व्यवहारे, पुष्पाबाई बाबर, उषा उकळे, मनीषा शिंदे, शिवनंदा व्यवहारे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निटूरमध्ये झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता खरोसेकर, निलंगा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे कुंभार, तसेच निटूरचे तलाठी कुंभार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. ३ एप्रिलपर्यंत गावात उच्च दाबाने पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आणि रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास, निटूरमध्ये रास्ता रोको व गावबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

Post a Comment

0 Comments