वलांडीत इफ्तार पार्टीतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश; मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न
देवणी : ( प्रतिनिधी / विक्रम गायकवाड ) तालुक्यातील वलांडी येथे शुक्रवारी (दि. २८ मार्च) पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. इफ्तार पार्टी व नमाज पठण झाल्यानंतर सर्वधर्मीय बांधवांसाठी उस्मानिया मस्जिदीमध्ये मस्जिद परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात नमाज पठण कसे केले जाते, याविषयी माहिती देण्यात आली. पवित्र कुरआनमध्ये नमाज अदा करताना किबला (काबा) कडे तोंड करण्याचा आदेश दिला असून, मस्जिद ही ईश्वराची (अल्लाहची) उपासना करण्याची जागा आहे. दिवसातून पाच वेळा दिल्या जाणाऱ्या अजानचे महत्त्व मराठीत समजावून सांगण्यात आले. मस्जिदमधील मिंबर (जिथून इमाम खुतबा प्रवचन देतो), तहारतखाना आणि वजूखाना (प्रार्थनेपूर्वी स्वच्छतेसाठी असलेल्या जागा) प्रत्यक्ष दाखवून त्यांची माहिती देण्यात आली.
परमेश्वर (अल्लाह) आराधनेविषयी सविस्तर मार्गदर्शन मूजीब मोमीन सर यांनी केले. या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "मस्जिद आणि मुस्लिम समाजाविषयी काही गैरसमज मनात होते, पण हा कार्यक्रम पाहून ते दूर झाले." तसेच त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या इफ्तार पार्टीला पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर, पंडित अण्णा धूमाळ, गटविकास अधिकारी सागर वरंडेकर, सपोनि माणिकराव डोके, मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे तसेच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच राम भंडारे, अंकुश गायकवाड, हसन मोमीन, शादूल बौडीवाले, अहमद पठाण, अक्रम शेख, निहाज मूर्शेद आदींनी केले होते.
0 Comments