Latest News

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – जीवनकुमार मद्देवाड

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – श्री जीवनकुमार मद्देवाड


अहमदपूर : तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक २९ मार्च रोजी शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळावा पार पडला. या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ग्राम ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक दादासाहेब गायकवाड होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, जिल्हा संघटक आयुक्त (भारत स्काऊट गाईड) डॉ. शंकर चामे, सीईओ सौ. रितू मद्देवाड माले, प्राचार्या जेबाबेरला नादार उपस्थित होत्या. तसेच पीटीए उपाध्यक्ष रोहिदास कदम, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, पालक-शिक्षक सभेचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्यांनी प्रास्ताविक करताना पालकांनी आपल्या मुलांना नेहमीच प्रोत्साहन आणि सकारात्मक ऊर्जा देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.


 पालकांना संबोधित करताना जीवनकुमार मद्देवाड म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी पालक व शिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि त्यांच्या गरजा तसेच समस्यांकडे लक्ष द्यावे. आमच्या शाळेत गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते आणि ते पुढेही कायम राहील, याची खात्री पालकांनी बाळगावी." तसेच, पुढील शैक्षणिक वर्षातील बदलांविषयी पालकांना माहिती देण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात दादासाहेब गायकवाड म्हणाले, "पालकांनो, आधी तुमच्या हातातील मोबाईल बाजूला ठेवा, मगच तुमच्या मुलाच्या हातातील मोबाईल आपोआप दूर होईल. कोणत्याही सकारात्मक बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी, मगच इतरांना त्याबाबत सांगावे." तसेच, "मुलं पालकांचंच अनुकरण करतात, त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांसमोर योग्य उदाहरण ठेवावे," असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. पालकांनी शिक्षणावरील खर्च हा खर्च न समजता तो एक महत्त्वाची गुंतवणूक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ शाळेची फी भरून पालकांची जबाबदारी संपत नाही, तर शिक्षकांशी सातत्याने संपर्क ठेवला तरच विद्यार्थ्यांच्या विकासात आमूलाग्र बदल घडू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. शंकर चामे यांनी पालकांना उद्देशून सांगितले, "ही पिढी देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत." तसेच, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "विद्यार्थ्यांनो, प्रामाणिकपणे अभ्यास करा, यश नक्की मिळते." या मेळाव्याला पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या शेवटी वार्षिक परीक्षेचा निकाल पालकांसमोर जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगमेश्वर ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद वलसे, गोपाल गवळी, सूर्यकांत गोरे, धनंजय राचमाळे, अंजली मद्देवाड यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments