सण-उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करा – जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचे आवाहन
लातूर : आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महात्मा बसवेश्वर जयंती हे सण कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे व पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हॉलमध्ये २९ मार्च रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी जिल्हाधिकारी नेटके, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांसह शांतता समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सण-उत्सव साजरे करताना न्यायालय व प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना आखल्या आहेत. गर्दीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीस टाळण्यासाठी पर्यायी मार्ग नियोजन, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्या सतर्क ठेवण्याच्या सूचना, शोभायात्रा मार्गावरील प्रकाश व्यवस्था दुरुस्त करण्याचे निर्देश, वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी
सोशल मीडियावर करडी नजर
सण-उत्सवादरम्यान सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कोणत्याही पोस्ट, व्हिडीओ किंवा अफवा प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी सायबर सेलद्वारे २४ तास नजर ठेवली जाणार आहे. पोलीस प्रशासनाने शांतता व सुव्यवस्थेसाठी दहशतवादविरोधी पथक, सोशल मीडिया मॉनिटरींग युनिट, RCP प्लाटून, QRT प्लाटून यांची विशेष तैनाती केली आहे. तसेच दंगाकाबू रंगीत तालीम देखील आयोजित करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी सामाजिक शांतता व सलोखा राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0 Comments