केळगाव येथे हजरत बाहांबीर साहेब यांची दोन दिवसीय यात्रा: श्रद्धेचा संगम
निलंगा : तालुक्यातील केळगाव येथील ग्रामदैवत हजरत बाहांबीर साहेब आणि हजरत बकाशवली यांच्या वार्षिक यात्रेचे आयोजन यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. या यात्रेला पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हिंदू-मुस्लिम तसेच सर्वधर्मीयांना एकत्र आणणारी ही यात्रा श्रद्धेचा संगम घडवते. ही यात्रा दिनांक 5 एप्रिल हजरत बाहांबीर साहेब तर 6 एप्रिल हजरत बकाशवली यांची यात्रा होईल.
परंपरा आणि श्रद्धेचा महोत्सव
यात्रेच्या निमित्ताने गावकरी विविध धार्मिक विधी पार पाडतात. घरगुती शुभकार्य, लग्नसोहळे तसेच दुभत्या जनावरांचे पहिले तूप येथे अर्पण करण्याची परंपरा आहे. मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी स्थायिक असलेले गावकरीही दरवर्षी या यात्रेत सहभागी होतात. यात्रेतील एक खास वैशिष्ट्य म्हणजे येथे मलिदा, साखर, गूळ, बताशे, पेढे, शेंगा आणि विविध गोडधोड पदार्थ अर्पण केले जातात, मात्र नारळ अर्पण करण्याची प्रथा नाही. यात्रेच्या सांगतेसाठी कुस्त्यांचा भव्य फड रंगतो, ज्यामध्ये राज्यभरातील नामांकित मल्ल सहभागी होतात. ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीतील भाविकांना मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार जावेद मुजावर यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
0 Comments