कासार शिरशी येथे जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न
कासार शिरशी: जागतिक महिला दिनानिमित्त नानी माँ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि साऊ एकल महिला पुनर्वसन समिती (निलंगा तालुका) यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समितीचे तालुका समन्वयक फिरोज जागीरदार यांनी भूषवले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना डविले (बचत गट समन्वयक), रावते सर (मुख्याध्यापक), होळकुंदे मॅडम, अलका मुळे आणि शीतल बिराजदार उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना फिरोज जागीरदार यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, कृषी योजना, बचत गट योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र योजनांचा लाभ घेऊन महिलांनी छोटे-मोठे उद्योग उभारावेत असे आवाहन केले. तसेच, साऊ एकल महिला पुनर्वसन समिती कोरोना काळापासून एकल महिलांना सहकार्य व मार्गदर्शन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापुढील काळात महिलांसाठी विविध कौशल्य व लघु उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्यात रावते सर यांनी महिला बचत गट व उद्योग प्रशिक्षण याविषयी मार्गदर्शन केले, तर कल्पना डविले मॅडम यांनी महिलांच्या गटबांधणीवर भर देऊन त्यांना सक्षम करण्यावर चर्चा केली. या कार्यक्रमाला अशा बिराजदार, शीतल बिराजदार सह परिसरातील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.
0 Comments