लातूर जिल्ह्याच्या 19 वर्षाखालील खेळाडूंचे राज्यस्तरीय शालेय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेत उत्तम यश!
लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य आणि अहिल्यानगर जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धा 2024 - 2025 शिर्डी येथे दिनांक 24 मार्च ते 25 मार्च 2025 दरम्यान संपन्न झाल्या.
या स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या 19 वर्षाखालील खेळाडूंनी उज्ज्वल कामगिरी करत पदके जिंकली. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि देवणी तालुक्यातील 19 वर्षाखालील मुला-मुलींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत लातूर जिल्ह्याचा 19 जणांचा संघ सहभागी झाला होता, यामध्ये 9 महिला खेळाडू आणि 10 पुरुष खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या संघामध्ये निटूर येथील छत्रपती शाहू विद्यालयातील 11 खेळाडू, कै. यशवंतराव चव्हाण विद्यालय, बोरोळ येथील 6 खेळाडू आणि विवेक वर्धनी हायस्कूल, देवणी येथील 2 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
संघाने 2 सुवर्णपदके, 2 रजतपदके आणि 13 कांस्यपदके पटकावून लातूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. या यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक के. वाय. पटवेकर आणि सहप्रशिक्षक विश्वजीत येणकुरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संघ व्यवस्थापक म्हणून ईश्वर हासबे आणि विष्णू इंगलवाड यांनी जबाबदारी पार पाडली, तर टीम कोच म्हणून शुभम बोडके यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. लातूर जिल्हा व शहर ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष खय्युम तांबोळी व सचिव के. वाय. पटवेकर, छत्रपती शाहू मा. उच्च मा. विद्यालय निटूरचे प्राचार्य अनिल सोमवंशी, प्रा. संतोष सोमवंशी, देवणी नगरीचे मा. नगराध्यक्ष प्रतिनिधी आर एस मन्सुरे, विवेक वर्धनी हायस्कूलचे मुख्याध्यापक एन व्ही पटवारी, बाबुराव इंगोले, कै. यशवंतराव चव्हाण मा. उच्च. मा.विद्यालय बोरोळचे प्राचार्य व्यंकट शिरसे यांनी शुभेच्छा दिल्या. शिर्डी येथे झालेल्या या स्पर्धेत लातूरच्या 19 वर्षाखालील खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील सन्मान वाढला असून, सर्व स्तरांतून या खेळाडूंच्या यशाचे कौतुक होत आहे.
0 Comments