लातूर पोलिसांची तत्पर कारवाई: विवेकानंद चौक हद्दीतील खून प्रकरणाचा छडा; आरोपी अटकेत
लातूर : विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अनोळखी इसमाच्या खून प्रकरणाचा लातूर पोलिसांनी वेगाने छडा लावला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दि. 6 ते 7 फेब्रुवारीच्या दरम्यान बाभळगाव नाका ते बसवेश्वर चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोड लगत एका हॉटेलच्या शेजारी अज्ञात व्यक्तीचा चेहऱ्यावर दगड मारून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास केला. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मृताची ओळख पटवत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
मृताची ओळख बीड जिल्ह्यातील नेकणूर येथील नजीर पाशा सय्यद असे पटली. तपासाची दिशा निश्चित करून पोलीस पथकाने मारेकऱ्याचा शोध घेतला आणि 14 फेब्रुवारी रोजी आरोपी सतिष भिमराव वाघमारे (रा. चाटगाव, धारूर) याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने वैयक्तिक वादातून नजीर सय्यदच्या डोक्यावर दगड मारून खून केल्याची कबुली दिली. या तपासात पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण आणि धडाडीने काम करत गुन्ह्यातील अनोळखी मृताची ओळख पटवून आरोपीला अटक केली. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पोलीस पथकाने उत्कृष्ट समन्वय साधत न्यायाला वाचा फोडली. पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूरच्या या यशस्वी तपासामुळे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रशंसा होत आहे. त्यांचे कर्तव्यनिष्ठ, तडफदार आणि काटेकोर तपास कौशल्य लातूर पोलिसांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
0 Comments