लातूर: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचार आणि दादागिरी विरोधात वाहतूकदार संघटनांचे गांधीगिरीचे आंदोलन
लातूर : लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांच्याकडून होत असलेल्या आर्थिक लूट आणि अधिकाऱ्यांच्या दादागिरीविरोधात जिल्ह्यातील सर्व वाहतूकदार संघटनांनी एकत्र येऊन कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. वाहतूकदारांनी गांधीगिरीच्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची प्रचंड आर्थिक लूट होत असून, जाब विचारण्यासाठी गेलेल्या वाहतूकदारांना अधिकारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे उपोषणकर्त्यांनी गंभीरपणे सांगितले. अशा भ्रष्ट आणि दादागिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच कार्यालयातील दलालांचा बंदोबस्त करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या आंदोलनात लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन, जिल्हा युवा मोटार मालक संघ, लोकनायक मोटार चालक मालक संघ, जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना, टायगर ऑटोरिक्षा संघटना, आझाद मोटार चालक मालक मेकॅनिक संघ, प्रहार जनशक्ती पक्ष, भाजमुयो, कामगार मोर्चा आणि इतर अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, "आगामी २० जानेवारी २०२५ पर्यंत शासनाने भ्रष्ट, लाचखोर आणि दादागिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करू."
0 Comments