पणजी येथे नॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
पणजी : गोवा किकबॉक्सिंग एसोसिएशन (जीकेए) ने 19 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान पणजी येथील इनडोर स्टेडियम कॅम्पलमध्ये नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित केली. या स्पर्धेतील खेळाडू देशभरातून आले होते, त्यामध्ये केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडीसा, वेस्ट बंगाल, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा आणि हरियाणा राज्यातील विशेष सैन्य दलातील जवानांचा समावेश होता. किकबॉक्सिंगच्या लो किक आणि फुल कॉन्टॅक्ट प्रकारांमध्ये या जवानांनी आपले कौशल्य दाखवले. स्पर्धेत 600 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे आयोजन चार मॅट बाऊट्स आणि रिंग बाऊटमध्ये करण्यात आले होते. गोवा राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले.
उद्घाटनावेळी श्री. गावडे यांनी किकबॉक्सिंगसारख्या क्रीडायुद्धाच्या खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल कौतुक व्यक्त केले. त्यांनी क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी गोव्यातील क्रीडाप्रेमींचा उत्साह आणि सक्रियतेबद्दल समाधान व्यक्त केले. गोव्यात क्रीडा पर्यटनाची निर्मिती करण्याची दिशा त्यांनी दिली आणि किकबॉक्सिंगच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांना सहकार्य करण्याचा विश्वासही व्यक्त केला. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेतील प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्योजक असिफ अब्बास अहमद सह गोवा व महाराष्ट्र राज्यातील अन्य मान्यवरही उपस्थित होते.
मंचावर नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशन (वाको इंडिया) चे संस्थापक प्रमुख सी. ए. तांबोळी, कार्यवाह अध्यक्ष बापूसाहेब घुले, माजी आमदार नरेश सावल, माजी आमदार प्रवीण जांत्ये, गोवा किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शेखर सालकर, उपाध्यक्ष शिवनंदपाल, महासचिव बाबुराव वर्वेकर, स्पर्धा आयोजक सचिव संतोष खैरनार, स्पर्धा तांत्रिक अधिकारी जयदेव मह्मणे तसेच विविध राज्यांचे किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव व इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार नरेश सावल यांनी स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी एक अत्यंत प्रेरणादायी विधान केले. त्यांनी सांगितले, "ज्या प्रकारे आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्यातून येथे आलात, तसेच लवकरच गोव्यामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आणि देशभरातून येणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांसोबत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होतील." हे शब्द क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंसाठी अत्यंत उत्साहवर्धक होते. त्यांच्या या विधानाने गोव्यात किकबॉक्सिंगच्या भविष्याबद्दल एक नवा दृष्टिकोन व उत्साह निर्माण केला. स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी माजी आमदार नरेश रावल यांनी विजयी संघांना व खेळाडूंना पदके आणि चषक देऊन गौरविले.
स्पर्धेत प्रथम पारितोषकाचा मान महाराष्ट्र राज्याने पटकावला, तर दुसऱ्या स्थानावर केरळ राज्य होते. तेलंगणा राज्याने तृतीय स्थान मिळवले, तर राजस्थान चौथे स्थानावर राहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गोवा किकबॉक्सिंग एसोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह डॉ. चंद्रशेखर सालकर, बाबुराव नाईक, शुभम ठुबे, संदीप पेडेकर, के वाय पटवेकर, मोहम्मद अली तांबोळी, आदित्य बुक्की, अशपाक तांबोळी, नितीन मुळे, नदीम तांबोळी, मिलिंद श्रीराम आणि अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीकृष्ण नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ मांड्रेकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने गोव्यात किकबॉक्सिंगच्या भविष्यातील प्रगतीची आशा निर्माण केली आहे.
0 Comments