Latest News

6/recent/ticker-posts

अकरावी IFSKA खुली महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

अकरावी IFSKA खुली महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

लातूर : इंटरनॅशनल पुनाकोशी शोतोकॉन कराटे असोसिएशनतर्फे आयोजित अकरावी IFSKA खुली महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा लातूरच्या टी. जी. फंक्शन हॉल, खाडगाव रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील तब्बल 400 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार अमित देशमुख यांच्या सुविद्य पत्नी अदितीताई अमित देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या प्रसंगी मंचावर माजी नगरसेवक रविशंकर जाधव, आयुब मणियार, पत्रकार के. वाय. पटवेकर, नेताजी जाधव, अनुराधा थोरात, आशिया सय्यद, सुरेखा गिरी, कैलास महानूवर आदी मान्यवर उपस्थित होते. काता व कुमिते या दोन प्रमुख प्रकारांमध्ये स्पर्धकांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत चित्तथरारक सामने साकारले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यांनी विजेत्यांना सन्मानचिन्ह, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविले.

अदितीताई अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात खेळांच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, युवकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य वृद्धिंगत करण्यासाठी खेळांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच आत्मरक्षण कौशल्याच्या विकासाला कराटे खेळाने कशी चालना मिळते, याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी देखील आत्मरक्षणाच्या गरजेवर जोर देत, कराटे सारख्या खेळांमुळे केवळ शरीराला बळकटी मिळत नाही तर संकटसमयी आत्मविश्वासाने वागण्याचे धैर्यही निर्माण होते, असे सांगितले. त्यांनी युवकांनी कराटेसारख्या खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष रवीकुमार शिंदे, पत्रकार के. वाय. पटवेकर, फिरोज शेख, कराटे प्रशिक्षक दत्ता कदम, अजित ढोले, रामेश्वर सगरे, सुजित गायकवाड, रेहान शेख, विशद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन अजित ढोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजमेर शेख यांनी मानले. कला, कौशल्य आणि शिस्तीच्या दर्शनाने परिपूर्ण या स्पर्धेमुळे कराटे खेळातील स्पर्धकांना मोठ्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली.

Post a Comment

0 Comments