Latest News

6/recent/ticker-posts

लातूरच्या अनुराधा टेकाळे हीची राज्याच्या शालेय हॉकी संघात निवड

लातूरच्या अनुराधा टेकाळे हीची राज्याच्या शालेय हॉकी संघात निवड

मध्यप्रदेश राज्यातील मंदसौर येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

सतीश तांदळे

लातूर : जिल्ह्यातील बिंदगीहाळ येथील हनुमान विद्यालयात ८ वी वर्गात शिक्षण घेत असलेली उदयोन्मुख खेळाडू कु.अनुराधा नवनाथ टेकाळे हीची १४ वर्ष वयोगटातील महाराष्ट्र राज्याच्या हॉकी संघात निवड झाली आहे. इस्लामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत अनुराधा टेकाळेची निवड करण्यात आली. बिंदगीहाळ येथील हनुमान विद्यालयाच्या हॉकी संघाने नेहमीच आपला दबदबा राखला आहे. आतापर्यंत २ खेळाडूंनी राष्ट्रीय तर २०० च्या वर खेळाडूंनी राज्यस्तरावर लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. कु. अनुराधा ही ८ वी वर्गात शिक्षण घेत आहे.

येत्या ९ ते १३ डिसेंबर २०२४ या दरम्यान मध्यप्रदेश राज्यातील मंदसौर येथे होत असलेल्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेत अनुराधा महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करेल. तत्पूर्वी ५ ते ८ डिसेंबर २०२४  रोजी यवतमाळ येथे होत असलेल्या शिबिरात भाग घेण्यासाठी ती रवाना होण्यापूर्वी माझं लातूर परिवाराच्या वतीने तिचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सतीश तांदळे,हॉकी संघाचे मार्गदर्शक काकासाहेब शिंदे आणि तिची आई उपस्थित होती.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अनुराधाने मिळविलेले हे यश इतर खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्म, वडिलांचे छत्र हरवलेले, क्रीडा साहित्याचा अभाव, मैदान, गणवेश अशा अनेक संकटांवर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने हे यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बिंदगीहाळ येथील या हॉकी संघाचे माझं लातूर परिवाराने पालकत्व स्वीकारले आहे. या होतकरु खेळाडूंना आवश्यक क्रीडा साहित्य वेळोवेळी पुरवून भक्कम आधार देण्याचे कार्य माझं लातूरने केले आहे. परिवाराच्या वतीने अनुराधा हिला शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments