लातूर : शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत खून प्रकरणातील फरार आरोपी उत्तराखंडमधून अटक
लातूर : शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने उत्तराखंड राज्यातून अटक केली आहे. दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी आयकॉन हॉस्पिटलमधील बाळू भारत डोंगरे (वय 35) यांचा मारहाण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. हे पथक विविध ठिकाणी रवाना झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे यांना उत्तराखंड राज्यातून अटक करण्यात आली. आरोपीला लातूरला आणण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रियेसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात येणार आहे.
0 Comments