देवणी तालुक्यातील खेळाडूंचा लातूर जिल्हा शालेय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन
देवणी : { प्रतिनिधी/विक्रम गायकवाड } क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर महानगरपालिका, लातूर शहर व जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलात शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण व शहरी ट्रॅडिशनल (बेल्ट व मास) रेसलिंग क्रीडा स्पर्धा 2024-25 उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत देवणी तालुक्यातील बोरळ येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे व देवणी येथील विवेक वर्धनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे खेळाडूंनी मास रेसलिंग व बेल्ट रेसलिंग या दोन खेळ क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत उज्वल यश संपादन केले.
मास रेसलिंग व बेल्ट रेसलिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये देवणीतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. निवड झालेल्या खेळाडूमध्ये सोहेल पठाण, ज्ञानेश्वर मोरतळे, नागेश डब्बे, शेखर मेहेत्रे, श्रीनाथ मेहत्रे, सुरज गायकवाड, अजय सूर्यवंशी, अंकित सूर्यवंशी, प्रेमसागर मोघे, शुभम बालूरे, अनिरुद्ध बिरादार आदींचा समावेश आहे. यशस्वी खेळाडूंचा देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या यशामागे प्रशिक्षक विश्वजीत येणकुरे व सहप्रशिक्षक शुभम बोडके यांचे मार्गदर्शन लाभले. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना त्यांच्या मित्रपरिवार व गावकऱ्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.
0 Comments