महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 35 व्या वर्षपूर्ती निमित्त आळंदी येथे संविधान जागर परिषद व अधिवेशन – राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे
लातूर: शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यावर्षी 35 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान स्वीकारण्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पातळीवरील भारतीय संविधान जागर परिषद आणि समितीचे दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 27, 28 आणि 29 डिसेंबर 2024 रोजी आळंदी (पुणे) येथील मराठा फ्रूट मार्केट धर्मशाळेत होणार आहेत. याबाबत माहिती देताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी 22 डिसेंबर रोजी अंबाजोगाई रोडवरील हॉटेल शांताई येथे पत्रकार परिषद घेतली.
27 डिसेंबर रोजी होणारी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद खुदाई खिदमतगार संघटनेचे नेते फैजल खान यांच्या हस्ते उद्घाटित होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील असतील. राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे प्रमुख उपस्थित राहतील. 28 व 29 डिसेंबर रोजी समितीचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते उद्घाटित होईल. या अधिवेशनात समितीच्या 35 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत माधव बावगे यांनी ही माहिती दिली.
0 Comments