निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी ६:०० वाजेपासून थांबणार; आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा
पोलीस बंदोबस्त तैनात; भरारी पथकांची कार्यवाही होणार गतिमान
मोबाईलवरील बल्क एसएमएस, व्हाईस कॉलद्वारे प्रचारास बंदी
लातूर: दि. १७ - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:०० दरम्यान मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान संपण्यापूर्वीचे शेवटचे ४८ तास हे सोमवार, १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:०० पासून सुरु होत आहेत. निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी ६:०० वाजेपासून थांबणार; आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज राजकीय प्रचार बंद होणार आहे. या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे सांगितले. मतदान प्रक्रिया संपण्यापुर्वीच्या ७२ तासात करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. सामान्य निवडणूक निरीक्षक डॉ. करुणा कुमारी, लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान, साकेत मालवीया, पोलीस निवडणूक निरीक्षक प्रमोद कुमार मंडल, निवडणूक खर्च निरीक्षक काकराला प्रसांत कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी संगीता टकले, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत यांच्यासह सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मतदान प्रक्रिया संपण्यापूर्वीच्या ७२ तासांसाठीची कार्यचालन प्रणाली जिल्ह्यात लागू झाली आहे. तसेच सोमवारी सायंकाळी ४८ तासांची कार्यचालन प्रणाली लागू होणार आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असून भरारी पथके अधिक गतिमान पद्धतीने कार्यरत राहतील. तसेच मतदारांना रोकड, भेटवस्तू, मद्याचे वाटप होवू नये, तसेच त्यांना धमकाविण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्रावरील प्रक्रियेचे वेब कास्टिंग करण्यात यावे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत वेब कास्टिंगसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करून त्याबाबत निगराणी करण्यात यावी, असे सामान्य निवडणूक निरीक्षक डॉ. करुणा कुमारी यांनी सांगितले. चार पेक्षा अधिक मतदान केंद्र एकाच परिघात असलेल्या ठिकाणी मतदारांची गर्दी होवू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना सामान्य निवडणूक निरीक्षक साकेत मालवीया यांनी दिल्या.
ईव्हीएम मशीन सोबत असताना मतदान पथकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मतदान पथके रवाना होताना याबाबत सूचना द्याव्यात, असे पोलीस निवडणूक निरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी सांगितले. शेवटच्या काही तासात मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार घडू नयते, यासाठी सर्व भरारी पथके, व्हीएसटी यांनी अधिक दक्ष राहून काम करण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक काकराला प्रसांत कुमार यांनी दिल्या. मतदारांना प्रलोभने, आमिष दाखविण्यासाठी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर ४८ तासापूर्वी मतदारसंघाबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे या जिल्ह्याचे, मतदार संघाचे मतदार नसलेले, राजकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीतील कार्यकर्ते, मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे. ४८ तासाच्या शांतता काळामध्ये मोबाईलवरील बल्क एसएमएस, व्हाईस कॉलद्वारे प्रचारास बंदी घालण्यात आली आहे.
मतदान केंद्र परिसरात मोबाईल वापरावर बंदी
भारत निवडणूक आयोगाने ज्यांना अधिकारी दिले आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट, मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी. कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदानादिवशी सार्वजनिक सुटी जाहीर; बाजार बंद
२० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या दिवशी केवळ मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट या काळात सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन तासाची सुटी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बुधवार २० नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसरे दिवशी घेण्यात येणार आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक यांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर
उमेदवार, राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी अनधिकृत बाबींचा वापर केला जात असल्यास याबाबतची माहिती भ्रमणध्वनी क्रमांकावर कळविण्याचे आवाहन निवडणूक खर्च निरीक्षक काकराला प्रसांत कुमार आणि डॉ. रामसिंह गुर्जर यांनी केले आहे. काकराला यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९२७०१५४५८४ असून डॉ. गुर्जर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७६२०५५२८६१ असा आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांवरविविध प्रकारची प्रलोभने दाखविण्यासाठी मद्यवाटप, पैशांचे वाटप, मोफत भेटवस्तूंचे वाटप यासारख्या अनधिकृत प्रकारांचा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या भ्रमणध्वनी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदान पथकातील मनुष्यबळ, मतदान केंद्रांवरील सुविधा, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्रांचे व्यवस्थापन, मतदार जागृती आदी बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला.
0 Comments