उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींसाठी लातूर येथे वसतिगृहाची सुविधा
लातूर : जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अल्पसंख्यांक विभागामार्फत लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे एकूण १०० विद्यार्थिनी क्षमतेचे अल्पसंख्यांक वसतिगृह चालविण्यात येत आहे. २१ जून, २०१३ च्या शासन निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशाबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.
वसतिगृहातील प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेली कार्यपध्दतीनुसार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची अधिवासी (Domicile) असावी, लाभार्थी विद्यार्थिनी इयत्ता बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेणारी असावी, महाविद्यालयातून नाव कमी केल्यास अथवा तिने महाविद्यालय सोडल्यास वसतिगृहामध्ये वास्तव्य करता येणार नाही. वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनीने पूर्णवेळ शासनमान्य अभ्यासक्रमात प्रवेश घेणे आवश्यक आहे. विद्यार्थिनी शिकत असलेली अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच वसतिगृहात वास्तव्य करण्यास पात्र राहील. लाभार्थी विद्यार्थिनीने निवड केलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या कालावधीपर्यंत वसतिगृहात करण्यास पात्र राहील. विद्यार्थिनीने प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या सर्व परीक्षा (तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, लेखी परीक्षा इत्यादी) झाल्यानंतर एका आठवड्यात वसतिगृह सोडणे बंधनकारक राहिल.
विद्यार्थीनी पूर्ण अनुत्तीर्ण झाल्यास व त्या अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ अधिकृत (बोनाफाईड) विद्यार्थिनी नसल्यास त्याला वसतिगृहात वास्तव्य करता येणार नाही, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींची वसतिगृहातील तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमा दरम्यानची शैक्षणिक संस्थेतील वर्तणूक चांगली असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थिने वसतिगृहात लागू असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या निकष व अटी सबंधित पात्र अल्पसंख्यांक विद्यार्थिनींनी लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांशी संपर्क साधून वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी केले आहे.
0 Comments