Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू

लातूर जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू


निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी विविध पथके तैनात

लातूर : दि. १५ - जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. सर्व निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, भयमुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असून, सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील २० लाख ३६ हजार ५६७ मतदार यावेळी आपला हक्क बजाविणार आहेत. यामध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील जवळपास ५४ हजार ६७४ मतदार आहेत. तसेच ८५ वर्षांवरील ३६ हजार ५६ आणि दिव्यांग १८ हजार ६३९ मतदार आहेत. जिल्ह्यात यावेळी ४० नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून एकूण २ हजार १४२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिली. तसेच गतवेळी कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवरील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध पथके

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ३६ स्थिर निगराणी पथके, ४२ भरारी पथके तैनात करण्यात आली असून २४० क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पेड न्यूज, फेक न्यूज, सोशल मिडीयावर लक्ष ठेवले जाणार आहे. सी-व्हीजील ऍपच्या माध्यमातून नागरिकांना आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणार आहे. यासोबतच नागरिकांसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ व्यवस्थापन, निवडणूक खर्च संनियंत्रण यासारखी २८ पथके कार्यरत करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

अवैध प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना : पोलीस अधीक्षक

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये परवानाधारक शस्त्रे जमा करून घेणे, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया आदी बाबींचा समावेश आहे. यासोबतच आंतरराज्य सीमेवर ६ चेक पोस्ट उभारण्यात येणार असून याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. मद्य वाटप, मौल्यवान वस्तू अथवा रकमेचे वाटप करण्यासारखे अवैध प्रकार आढळून आल्यास त्याच्या मुळापर्यंत जावून संबंधितांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले जाणार आहे. सायबर सेलच्या माध्यमातून सोशल मिडिया संनियंत्रण केले जाणार आहे. सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट्स, फेक न्यूज, हेट न्यूजवर आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२४

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – २२ ऑक्टोबर २०२४ 

नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक- २९ ऑक्टोबर २०२४

नामनिर्देशन पत्रांची छाननी- ३० ऑक्टोबर २०२४

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक- ४ नोव्हेंबर २०२४

प्रत्यक्ष मतदानाचा दिनांक- २० नोव्हेंबर २०२४

मतमोजणी दिनांक- २३ नोव्हेंबर २०२४

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक- २५ नोव्हेंबर २०२४

Post a Comment

0 Comments