लातूर जिल्हा बॉल बॕडमिंटन संघ राज्यात प्रथम
पुणे: दि. २० ते २३ सप्टेंबर २०२४ दरम्यान गोंदिया जिल्हा येथे संपन्न झालेल्या ४३ व्या महाराष्ट्रा स्टेट बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशीप २०२४-२५ मध्ये लातूर जिल्हा संघाने पुणे जिल्ह्यावर २-१ अशा फरकाने विजय मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. सदरील राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांनी सहभाग नोंदविला होता.
राज्यातील जवळपास ६०० मुले व मुलींना या स्पर्धांत आपल्या खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच लातूर जिल्ह्याने अमरावती व बुलढाणा जिल्हा यांना सरळ सरळ दोन सेट मध्ये हरवत एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेत आपली दावेदारी स्पष्ट केली. राज्यस्तरीय स्पर्धेत पुढे रायगड, यजमान गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांवर विजय मिळवित लातूर जिल्ह्याने सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. सेमी फायनल मध्ये गतवर्षाचा रौप्य पदक प्राप्त हिंगोली जिल्ह्याचा पराभव करत अंतिम सामन्यात पोहचून लातूर जिल्हा संघाने गतवर्षाच्या विजेत्या बलाढ्य पुणे जिल्हा संघावर २-१ अश्या फरकाने मात करीत मानाच्या राज्यस्तरीय स्पर्धा २०२४-२०२५ चे सुवर्ण पदक प्राप्त केले.
लातूर जिल्हा संघाची कर्णधार साक्षी रोकडे या खेळाडूने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नेत्रदिपक कामगीरी करीत उत्कृष्ट खेळाडू ठरली त्यामुळे राज्य संघटनेचे महासचिव अतुल इंगळे, कार्याध्यक्ष डि.एस.गोसावी, कोषाध्यक्ष विजय पळसकर, उपाध्यक्ष रींकु पापडकर, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त राजाभाऊ भंडारकर, निवड समितीचे डॉ हरीष काळे, सौ. मंजुषा खापरे यांनी साक्षी रोकडे यास महाराष्ट्र संघाचे कर्णधार जाहीर केले असुन लातूर ची दुसरी खेळाडू नंदिनी माळेकरी याचीहि महाराष्ट्राच्या संघात निवड केली असून दिनांक २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान रोहतक - हरीयाणा येथे होणाऱ्या आॕल इंडिया नॕशनल बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशीप साठी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी ते आज नागपुर येथून रवाना होत आहेत. विजयी लातूर जिल्हा संघात साक्षी रोकडे, नंदिनी सुर्यवंशी, अनुराधा सुर्यवंशी, नंदिनी माळेकरी, रोहिणी सुर्यवंशी, संस्कृती पाटिल, वंदना ढवळे या खेळाडुंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले असून त्यांना प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू मनीषा सुर्यवंशी, अर्शद शेख, आमेर, अय्युब यांनी मार्गदर्शन केले असून खेळाडुंच्या यशाबद्दल जिल्हा अध्यक्ष ज्ञानोबा भोसले, संगमेश्वर निला, सचिव असद शेख, अकबर पठाण, तानाजी कदम, नईम निवड समितीचे तबरेज सय्यद, अदनान शेख, इम्रान खान यांनी सत्कार करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments