मांजरा,तेरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर:(जिमाका) दि.25 - मांजरा प्रकल्पाचा पाणीसाठा 96.5 टक्के झाला आहे. पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने 25 सप्टेंबर, 2024 रोजी मांजरा प्रकल्पाचे 2 दरवाजे हे 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 1 हजार 730 क्युसेक (49.00 क्युमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच निम्न तेरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी नियंत्रित करण्योच्या दृष्टिने निम्न तेरणा 16 हजार 5 क्यूसेक (453.2 क्यूमेक्स) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा व तेरणा नदीकाठच्या गावाना, शेतकऱ्यांना, नदीकाठी वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जावू नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जावू नये. पाऊस सुरु असतांना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.
0 Comments