Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा रुग्णालयासाठी १ ऑक्टोबर पासून होणारे माझं लातूर परिवाराचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर घेतला निर्णय

जिल्हा रुग्णालयासाठी १ ऑक्टोबर पासून होणारे माझं लातूर परिवाराचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर घेतला निर्णय


लातूर : जिल्हा रुग्णालयाचा प्रलंबित प्रश्न निकाली काढावा अशी आग्रही मागणी करीत माझं लातूर परिवाराने २८ सप्टेंबर २०२४ पासून आंदोलनास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून १ ऑक्टोबर २०२४ पासून गांधी चौक येथे आमरण उपोषणाचे आंदोलन करण्यात येणार होते. शासनाकडे जागा हस्तांतरण निधीसाठी पाठपुरावा केला असून निधी उपलब्ध होताच हस्तांतरण कार्यवाही तात्काळ करण्यात येईल असे लेखी आश्वासन निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिल्यानंतर फक्त आमरण उपोषण आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय माझं लातूर परिवाराने घेतला आहे.

लातूर जिल्हा रुग्णालयाचा मंजूर असूनही केवळ ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये निधी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कृषी विभागास वर्ग केला नसल्याने रखडला आहे. १९ जून २०२४ रोजीच्या शासन आदेशात जागा हस्तांतरण आणि निधीची तरतूद करण्यात आल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. निधी वर्ग करून ६० दिवसांच्या आत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देखील आदेशात देण्यात आले आहेत. मात्र आज १०१ दिवस होऊन देखील शासनाने निधी उपलब्ध करून दिला नाही. या महत्वपूर्ण विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माझं लातूर परिवाराने २८ सप्टेंबर २०२४ पासून आंदोलनास सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळातील नेत्यांचे, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे मुखवटे घालत भीक मागून निधी गोळा करण्यात येत आहे. तर १ ऑक्टोबर २०२४ पासून महात्मा गांधी चौक येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला होता.


जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी माझं लातूर परिवारास दिलेल्या पत्रात शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला असून निधी मिळाल्याबरोबर जागा हस्तांतरण प्रक्रिया तात्काळ करण्यात येईल त्यामुळे आपण हाती घेतलेले आमरण उपोषण आंदोलन स्थगित करावे अशी विनंती करण्यात आली आहे. या अनुषंगाने माझं लातूर परिवाराच्या आज झालेल्या बैठकीत नियोजीत आमरण उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला तर निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्याने भीक मागो आंदोलन सुरूच राहील असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सतिश तांदळे, अभय मिरजकर, दिपरत्न निलंगेकर, डॉ सितम सोनवणे, नितीन बनसोडे, रत्नाकर निलंगेकर, सचिन अंकुलगे, युवराज कांबळे, काशीनाथ बळवंते, उमेश कांबळे, विष्णु आष्टीकर, ॲड. एकनाथ गजीले, डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments