प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १२ वीच्या परीक्षेत नम्रताचे घवघवीत यश
एकही खाजगी शिकवणी वर्ग न करता मिळविले ९३.५० टक्के गुण
सतीश तांदळे
लातूर : परिस्थितीबद्दल कसलीही तक्रार न करता प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करीत लातूरच्या नम्रता रामराव धाकपडे या मुलीने १२ वी परीक्षेत ९३.५० टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कुठलाही खासगी शिकवणी वर्ग नसताना आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नम्रताचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नम्रता ही लातूर येथील शाहू महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत शिकत होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. रामराव धाकपाडे हे मुळचे पानगाव येथील रहिवासी असून मुलांच्या शिक्षणासाठी १५ वर्षांपूर्वी ते लातूर शहरात आले. ते एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करतात. त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. मोठा भाऊ अभिनव बारामती येथे इंजिनिरिंगचे शिक्षण घेत आहे तर लहान भाऊ प्रणव याने दहावीची परिक्षा दिली आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही अभ्यासाचे योग्य नियोजन, वर्गात नियमित उपस्थिती, जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन या जोरावर नम्रताने मिळवलेले यश उल्लेखनीय आणि दिशादर्शक आहे. दहावीच्या परीक्षेतही गोदावरी कन्या प्रशालेतून तिने ९४.२० टक्के गुण मिळविले होते. एमबीए करून मानव संसाधन व्यवस्थापन (एच आर) क्षेत्रात करिअर करायचा नम्रताचा मानस आहे.
0 Comments