माझं लातूर परिवार मतदानाचा हक्क बजावणार
लातूर : गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी ७ महिने अविरत पाठपुरावा करणाऱ्या "माझं लातूर परिवार" या अराजकीय सामाजिक समूहातील काही सदस्यांनी शासनाचा निषेध आणि नाराजी व्यक्त करीत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिवारातील अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक मान्यवरांच्या सूचनेनुसार मतदान बहिष्कार निर्णय मागे घेण्यात येत आहे.
माझं लातूर परिवार हा लोकशाहीवर विश्वास असणारा, समाजातील प्रत्येक घटकातील सुज्ञ, शिक्षित मान्यवरांचा अराजकीय सामाजिक समूह म्हणून राज्यात परिचित आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला विरोध किंवा समर्थन करण्यासाठी हा समूह कार्यरत नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. विधायक आणि सकारात्मक सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणे, त्या प्रश्नांकडे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधून घेत अनेक लोकोपयोगी उपक्रम यशस्वीपणे पार पाडले आहेत.
निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा सर्वोच्च महोत्सव देशभरात साजरा होतो आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे या अधिकाराचा वापर करून "माझं लातूर" परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांनी, हितचिंतकांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे असे जाहीर आवाहन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments