उजेडच्या शिवारात रंगल्या बांधावरल्या कविता
उजेड : सायंकाळी पाचची वेळ.मांजरानदीच्या काठावरचा उजेड गावचा सुपीक शिवार,जतुसापचे प्रदेश सचिव बालाजी जाधव यांचे शेत, गोड केशर आंब्याची हिरवीगार झाडे,झाडाच्या सावलीला विसावलेले पशूधन, झाडावर जमलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट, आपल्याच मस्तीत शीळ घालणारा रानवारा व सोबतीला "बांधावरल्या कविता" हे विहंगम दृश्य काव्यप्रेमी रसिकांना अनुभवता आले. शब्दपंढरी प्रतिष्ठान, दिलासा फाउंडेशन व जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने उजेड ता.शिरूर अनंतपाळ येथे "बांधावरल्या कविता" हा पहिला कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात अमरदीप पाटील यांच्या सुरेल आवाजातील जिजाऊ वंदनेने झाली.
योगिराज माने यांनी जात एकच माणसाची सोड वर्गीकरण मित्रा.. चल करू या काळजाचे आज रूंदीकरण मित्रा... ही सामाजिक आशयाची गझल सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. पेरणी केली आहे कर्ज सावकाराचे काढून.. मुसळधार बरसून पावसा बाहेर काढ संकटातून.. ही कविता सादर करून दिलीप लोभे यांनी पावसाची विनवणी केली. सतीश हानेगावे यांनी तुझी आठवण आली.. मन पाणी पाणी झालं.. भिजलेलं रान कसं.. मऊ लोण्यावानी झालं.. काट्यातून चालताना.. राब राब राबताना.. किती खोल खोल गेली.. तुझ्या मनातली ओल.. ही हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. राजेंद्र माळी यांनी मातृविरहाची जीवघेणी सल त्यांच्या कवितेतून मांडली. ते म्हणाले, अपार हानी झाली आई तू गेल्याने.. जगण्यामधले सूर हरवले तू गेल्याने.. उदास झाले भकास झाले जीवन सारे.. अन् मायेचे झरे आटले तू गेल्याने.. प्रतिकूल परिस्थितीपुढे हतबल होऊन घरातील कर्त्या पुरूषाने केलेल्या आत्महत्येनंतरच्या विदारक परिस्थितीचे वर्णन गझलेतून करताना दयानंद बिराजदार म्हणाले, पोरके होईल सारे घर, कणा हा मोडल्यावर..
प्रश्न हे सुटतील का, गळफास कोणी घेतल्यावर.. कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदत्त मुंढे यांनी, या देहावर किती लक्तरे चढवू आता.. मी देहाला कशाकशाने मढवू आता.. अनेक प्रश्ने घेऊन येतो दिवस नव्याने.. आयुष्याची खिंड कशी मी लढवू आता.. ही गझल ऐकवून अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी जाधव ,सूत्रसंचलन दयानंद बिराजदार व आभार प्रदर्शन प्रकाश जाधव यांनी केले. कार्यक्रमास उजेड परिसरातील काव्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आबासाहेब पाटील,विवेक जाधव व मित्रपरिवाराने परिश्रम घेतले..
0 Comments