Latest News

6/recent/ticker-posts

यंदा फळाचा राजा आंब्याची गोडी महागली भाव आहे पण शेत शिवारात आंबाच नाही

यंदा फळाचा राजा आंब्याची गोडी महागली भाव आहे पण शेत शिवारात आंबाच नाही 


बी डी उबाळे 

औसा : गेल्या दीड दोन महिन्यात झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यात व गारपिटीत तालुक्यातील आंबा फळबागेतील फळाला आलेल्या झाडाच्या आंब्याची जवळपास ८० टक्के गळ झाली. केवळ २० टक्के उरलेल्या या राजा फळाच्या दरात दुपटीने वाढ झाली असून यावर्षी चांगल्या केशर आंब्याचा दर २०० रुपये किलो झाला आहे . तर गावरान लहान १०० व मोठा १५० रुपये किलोने विक्री होत असून यंदा आंब्याची गोडी दुपटीने वाढली आहे.  

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तौराची लागण झालेल्या झाडाचा आंबा अक्षयतृतीया दिवशीच्या शुभ मुहुर्तावर खाण्यासाठी बाजारात उपलब्ध होतो. त्याचबरोबर मोसमात आलेले फळ मोसमातच खाणे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असते. म्हणुन वर्षातील अक्षयतृतीया च्या शुभ मुहुर्तावर प्रत्येक कुटुंब कमी अधिक प्रमाणात आंब्याची खरेदी करुन खाणे पसंत करतात. अशी परंपरा गेल्या अनेक पिढ्या पासून सुरु आहे. यामुळे या मुहुर्तावर आंबा खरेदी करुन प्रत्येकजण खातात.

यावर्षी एप्रिल महिन्यात सलग पंधरा वीस दिवस झालेल्या  अवकाळी वादळी वाऱ्यात वर्षभर पोसलेला आणि पाच सहा महिन्यापासून जिवापाड जपलेल्या कैऱ्या या वादळात गळून पडल्या . या वादळात औसा तालुक्यातील जवळपास ८०० एकरातील लगडलेल्या आंब्याच्या बागा रिकाम्या झाल्या. फांदी पानाआड लपलेल्या १५ ते २० टक्के कैऱ्या तेवढ्याच वाचल्या. यामुळे शेतकऱ्यांनी वर्षभर या फळबागेसाठी केलेली मेहनत व खर्च तर वाया गेला आहेच. शिवाय बागेचे संगोपण करण्यासाठी खास करुन ठेवलेला सालगड्याचा दीड लाख रुपयांचा पगारीचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागतो आहे.

अवकाळी वादळाच्या व गारांच्या फटक्यात अतोनात आंबे फळगळ झालेल्या बागेतील उर्वरीत आंबा काढण्यासाठी खर्च वाढला असून बाजारातील वाढती मागणी आणि घटलेली आवक असल्याने यावर्षी गेल्या दशकातील सर्वाधिक भाव पाहवयास मिळत आहे. यंदा भाव आहे पण माल नाही अशी अवस्था परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे. यामुळे बाहेर तालुका व जिल्ह्यातील आंबा यंदा औसा तालुक्यातील बाजारात विक्री होत आहे. यावर्षी गावरान आंबा ५० रुपये किलो पासुन १५० रुपये किलोपर्यात विक्री होत आहे. तसेच चांगल्या प्रतीचा मोठा गोड आंबा २०० रुपये किलोपर्यंत विक्री होत आहे. याचबरोबर लहान केशर १५० ते १७५ रुपये किलो. तर मोठा चांगला गोड केशर आंबा २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. भादा व परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.

Post a Comment

0 Comments