इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 21 मे ला दुपारी 1:00 वा ऑनलाईन निकाल पाहता येणार
लातूर : (जिमाका) दि. 20 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च, 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र-इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 21 मे, 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. बारावी परीक्षेचा निकाल-
http://mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org, www.mahahsscboard.in, http://result.digilocker,gov.in, www.tv9marathi.com, http://result.targetpublications.org.in या संकेतस्थळावर पाहता येईल. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे डिजीलॉकर ॲपमध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. http://mahresult.nic.in या संकेस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यायांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पूनर्मूल्याकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 22 मे, 2024 ते 5 जून, 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल, त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, युपीआय, नेट बँकिग याद्वारे भरता येईल. फेब्रुवारी-मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेसाठी छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहीमत नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यंना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
फेब्रुवारी-मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट-2024 व फेब्रुवारी-मार्च,2025) श्रेणी तथा गुणसुधार योजनेजतंर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट-2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी 27 मे, 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
0 Comments