Latest News

6/recent/ticker-posts

दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांगितले मतदानाचे महत्व; जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये पथसंचालन करून केली जनजागृती

दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांगितले मतदानाचे महत्व; जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये पथसंचालन करून केली जनजागृती 


दिव्यांग मतदारांना ओळखपत्रांचे वाटप; मुकबधीर विद्यार्थ्यानींचे पथनाट्य सादरीकरण

लातूर : दि. 28 येथील पोलीस कवायत मैदानावर सुरु असलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व पटवून देत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मुकबधीर विद्यार्थिनींनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, स्वीप समितीचे नोडल अधिकारी नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे आणि शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडी, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे निवासी पोलीस निरीक्षक दिलीप माने यावेळी उपस्थित होते. तदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी राबविलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. यावेळी सादर झालेल्या पथनाट्यातून मतदारांना मतदानाचे महत्व समजून येण्यास मदत होईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तडवी म्हणाले. तसेच जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले.


रांगोळी, चित्रकृती, पथसंचालन आणि पथनाट्य यामाध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. यातून त्यांची लोकशाही बळकट करण्याबाबतची आणि मतदानाचे महत्व पटवून देण्याची तळमळ लक्षात येते. यासारख्या उपक्रमांमुळे मतदारांमध्ये जनजागृती होवून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असा विश्वास समाज कल्याण उपायुक्त श्री. देवसटवार यांनी व्यक्त केला. लोकशाहीमध्ये आपल्याला मतदानाचा सर्वात बहुमुल्य अधिकार मिळाला आहे. या अधिकाराची जाणीव ठेवून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. यामाध्यमातून आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे, असे नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त कोकरे यांनी सांगितले. यावेळी सर्व उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. प्रारंभी सर्व दिव्यांग खेळाडूंनी पथसंचालन केले. यामध्ये घोषवाक्यांचे फलक घेवून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमात मुकबधीर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. तसेच यावेळी दिव्यांग युवकांना मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुमारे 530 खेळाडू, 262 शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती. लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या स्वीप कक्षातील मधुकर ढमाले, रामेश्वर गिल्डा, विजय माळाळे यावेळी उपस्थित होते. राजू गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments