Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी "माझं लातूर परिवार" पुन्हा आक्रमक, २६ जानेवारी २०२४ पासून नव्याने आंदोलन करणार

जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी "माझं लातूर परिवार" पुन्हा आक्रमक, २६ जानेवारी २०२४ पासून नव्याने आंदोलन करणार


लातूर: गेल्या १२ वर्षांपासून मंजूर होऊनही प्रलंबित असलेला लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासाठी आता माझं लातूर परिवाराने आक्रमक भूमिका घेतली असून येत्या २६ जानेवारी २०२४ पासून नव्याने आंदोलन करण्याचा निर्णय टास्क फोर्सच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

गेल्या २ ऑक्टोबर २०२३ म.गांधी जयंती दिनी लातूरच्या महात्मा गांधी चौक येथे माझं लातूर परिवाराने बेमुदत साखळी उपोषण सुरू करून प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधले होते. स्थानिक प्रशासन आणि शासनाच्या वतीने १ महिन्याच्या आत जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाच्या ६ व्या दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०२३ रोजी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय माझं लातूर परिवाराने घेतला होता.


एवढ्यावर न थांबता १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे थेट मंत्रालय गाठून उपमुख्यमंत्री, पालक मंत्री, आरोग्य मंत्री, क्रीडा मंत्री, उद्योग मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर आणला. आज ३ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असतानाही याबाबत ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. शासन अजूनही या बाबत गंभीर नाही याची खंत असून जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत सनदशीर मार्गाने माझं लातूर परिवार आपले आंदोलन सुरू ठेवेल असा निर्णय आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. टास्क फोर्सच्या या बैठकीस माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, दिपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, ॲड. प्रदीप मोरे, डॉ. सितम सोनवणे, संजय स्वामी, काशिनाथ बळवंते, प्रमोद गुडे, ॲड. राहुल मातोळकर, गोपाळ झंवर, किशोर जैन आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments