जिजाऊ म्हणजे मातृत्वाचा दीपस्तंभ - डॉ.राखी शेळके
निटूर: "प्रत्येक आईच्या डोळ्यात आपलं मूल कर्तृत्ववान व्हावं हे स्वप्न तरळत असतं या मातांनी हे स्वप्न साकार करण्यासाठी राजमाता जिजाऊं यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी. मातृत्वाचे सर्वोत्तम उदाहरण आणि दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. आपल्या मुलांची सर्वांगीण व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी मातांनी सदैव जागरुक असायला हवं. मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध राखत त्यांची जडणघडण करावी लागेल. प्रत्येक कुटूंबात संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्याची आज नितांत गरज असून मुलगा मुलगी हा भेद न करता दोघांनाही समान संधी द्यायला हव्यात" असे मौलिक प्रतिपादन उजेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजित माता पालक मेळाव्यात डॉ.राखी शेळके यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी उपस्थित होत्या.
प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या वतीने प्रमुख अतिथींचे यथोचित स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी केले. गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी यांनी मातांना आपल्या मुलांच्या हितासाठी जागरुक राहण्याचे व शालेय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. माता पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पारंपारिक संक्रांतीचा सण लक्षात घेऊन तिळगुळ वाटप करण्यात आले व लेखन साहित्य पेनांचे वाण लुटण्यात आले. मेळाव्याचे सूत्रसंचलन श्रीदेवी गरगटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री कुमदाळे व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 Comments