Latest News

6/recent/ticker-posts

लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घेतला शेतात जाऊन आंबिल अन भज्जीचा आस्वाद

लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घेतला शेतात जाऊन आंबिल अन भज्जीचा आस्वाद


लातूर:(जिमाका) दि. 11 - जिल्ह्यातील येळवस अर्थात वेळाअमावस्या आता लातूर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख झाली आहे ती सर्वदूर पोहचली आहे. ही ओळख आणखी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी औसा तालुक्यातील येलोरी येथील शेतात जाऊन सप्त मातृकाचे पूजन करून आंबिल,भज्जीचा आस्वाद घेतला. यावेळी नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे या लातूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असून त्यातील वेळाअमावस्या हा लातूर जिल्ह्यातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक रान महोत्सव आहे. या महोत्सवाबद्दल राज्यातील लोकांना आकर्षण निर्माण झाले आहे. येणाऱ्या काळात विशेष नियोजन करून हा रान महोत्सव अधिक मोठ्या प्रमाणात प्रमोट करता येईल का यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईचे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचे औसा तालुक्यातील येलोरी हे गाव असून त्यांच्या शेतात ही वेळअमावस्या सर्वानी साजरी केली.यावेळी गावचे सरपंच, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments