तरुणांनो भ्रष्टाचार मुक्त भारताचे आधारस्तंभ व्हा- डॉ. बाबासाहेब ठोंबरे
कृषि महाविद्यालय लातूर येथे दक्षता जनजागृती सप्ताह संपन्न
लातूर: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय लातूर येथे दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षाच्या वतीने करण्यात आले होते.
भारताचे भूतपूर्व गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२३ ते ०५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. भ्रष्टाचार ही समाज पोखरणारी कीड असून तिचे समूळ उच्चाटन हेच समृद्ध भारताचे गमक आहे. तरुणांनी भ्रष्टाचार मुक्त भारताचे आधार स्तंभ व्हावे असे आवाहन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी आपल्या अध्यक्षपर भाषणात बोलताना विद्यार्थ्यांना केले. कृषि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराचे तोटे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक पंडित रेजितवाड, तर प्रमुख अतिथी म्हणून भास्कर पिल्ले, डॉ.विश्वनाथ कांबळे, डॉ.दिनेशसिंह चौहान यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात डॉ.ठोंबरे म्हणाले की, जागतिक पारदर्शकता सूचकांकात १८० देशांमध्ये पहिल्या काही नावांमध्ये डेन्मार्क, सिंगापूर यांचा समावेश असून भारताचा ८५वा क्रमांक आहे. तर सोमालिया हा सर्वात शेवटी आहे म्हणूनच तरुणांनी भ्रष्टाचार मुक्त भारताचे आधारस्तंभ व्हावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना रेजितवाड म्हणाले की, नागरीकांनी आज कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या पाठीशी पोलीस व न्यायपालिका सदैव असून त्यांनी अधिक सजग राहून भ्रष्टाचार विरोधी तक्रारी दाखल कराव्यात. यावेळी उपस्थितांना ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा : राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’ या बोधवाक्यासह भ्रष्टाचार विरोधी वर्तणुकीची शपथ देण्यात आली. मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत आमच्या मनातील देशभक्तीची भावना समृद्ध होण्यासाठी ओंजळीत मृदेचे प्रकटीकरणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. विजय भामरे यांनी तर आभार डॉ. दयानंद मोरे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवर्गीय अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments