जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवाराचे शिष्टमंडळ मंत्रालयात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट
लातूर : मंजूर असलेल्या जिल्हा रूग्णालयाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण रद्द करावे, सोयाबीन संशोधन केंद्र तसेच देवणी गोवंश संवर्धन केंद्र लातूरला द्यावे या प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन उपुख्यमंत्रीपद देवेंद फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली.
माझं लातूर परिवाराच्या वतीने लातूरकरांच्या हक्काच्या आणि न्याय्य मागण्यांसाठी २ ऑक्टोबर २०२३ पासून म. गांधी चौक येथे बेमुदत साखळी उपोषणाचे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनास सर्वच राजकीय पक्ष, जवळपास ५६ संघटना आणि हजारो लातूरकरांनी भरभरून पाठिंबा दिला होता. तर शासनाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यु पवार, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, पाशा पटेल, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, तहसिलदार सौदागर तांदळे यांनी शासनाकडे आपल्या मागण्या पाठवल्या असून लवकरच सकारात्मक निर्णय येईल अशी ग्वाही दिली आणि उपोषण १ महिन्यासाठी स्थगित करावे अशी विनंती आंदोलनकर्त्यांना केली. त्यानुसार उपोषण तात्पूर्ते स्थगित करण्याचा निर्णय माझं लातूर परिवाराच्या वतीने घेण्यात आला होता.
मुंबई येथे मंत्रालयात १९ ऑक्टोबर २०२३ रोजी कॅबिनेटची बैठक होती. या संधीचा लाभ घेण्यासाठी माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन आपल्या आंदोलनाची आणि मागण्यांची माहिती उपुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची त्यांच्या लोहगड या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपल्या आंदोलनाची माहिती आम्हाला मिळाली असून लातूरच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी मला पत्र पाठवून मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालय ही सर्व सामान्यांची गरज असून मी सकाळीच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना बोललो असल्याचे सांगितले. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल आणि लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यास आपण स्वतः उपस्थित राहू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळात सतीश तांदळे, अभय मिरजकर, दिपरत्न निलंगेकर, संजय जेवरीकर, डॉ. सितम सोनवणे, संजय स्वामी, काशिनाथ बळवंते यांचा समावेश होता.
0 Comments