कोकण विभागीय माहिती कार्यालय निर्मित अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेचे माहिती महासंचालकांच्या हस्ते प्रकाशन
नवी मुंबई: दि.18 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी तयार केलेल्या “अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेचे ” प्रकाशन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक श्रीमती जयश्री भोज (भाप्रसे) यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.
राज्यातील वत्तपत्रे, वृत्तसंस्था, इलेक्टॉनिक प्रसारमाध्यांमध्ये वृत्तविषयक काम करणाऱ्या पत्रकार प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. यासाठी शासनाव्दारे विभाग आणि राज्यस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रक्रीयेची परिपूर्ण आणि विहित माहिती नसल्यामुळे पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेसाठी अर्ज करताना अडचणी येतात. अपूर्ण भरलेले अर्ज आणि त्रुटींमुळे हे अर्ज नामंजूर होतात. यामुळे पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेपासून वंचित राहावे लागते. असे होऊ नये या करिता ही अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेत पत्रकारांना देण्यात येणा-या अधिस्वीकृती पत्रिकेबाबतच्या शासन निर्णयांची सोप्या शब्दांत माहिती देण्यात आली आहे. सविस्तर शासन निर्णय/नियमावली पाहण्याकरिता पुस्तिकेत दिलेल्या बारकोडवर स्कॅन करुन www.dgipr.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट देता येऊ शकते.
या छोटेखानी कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती व प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती, वृत्त व जनसंपर्क) राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, यांच्यासह कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे उपस्थित होते.
सदर पुस्तिकेची निर्मिती कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव-पाटील, आणि उपसंपादक प्रविण डोंगरदिवे यांनी केली असून, या पुस्तिकेचे मुखपृष्ठ चित्रकार सुशिम कांबळे यांनी तयार केले आहे. पुस्तिकेचे मुद्रण दै.कृषीवल, रायगड यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. ही पुस्तिका केवळ खाजगी वितरणासाठी उपलब्ध आहे.
0 Comments