जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवार आक्रमक
२ ऑक्टोबर २०२३ पासून म.गांधी चौक येथे बेमुदत साखळी उपोषण
लातूर: मंजूर होऊनही गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा यासह लातूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचा शासन निर्णय रद्द करावा आणि सोयाबीन संशोधन केंद्र लातूरलाच झाले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने येत्या २ ऑक्टोबर २०२३ पासून शहरातील गांधी चौक येथे बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त आणि गांधी चौक पोलिस निरिक्षक यांना माझं लातूर परिवाराच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच या आंदोलनाची माहिती आणि निवेदन ईमेलद्वारे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, कृषी मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, लातूर जिल्हा पालक मंत्री यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती माझं लातूर परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या :-
•मंजूर झालेल्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न त्वरित सोडवावा
•सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचा निर्णय रद्द करावा
•सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला झालेच पाहिजे
या मागण्या मान्य होईपर्यंत माझं लातूर परिवाराचे साखळी उपोषण सुरू राहील. लातूरच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व सजग नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाला बळ द्यावे असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments