लातूरच्या परिवहन कार्यालयात आयोजित नेत्र व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा संयुक्त उपक्रम
लातूर: प्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरच्या परिवहन कार्यालयात संपन्न झालेल्या नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात परिवहन कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, मोटार मालक, चालक यांच्यासह कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांनीही घेतला.
परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा अभियान आणि आरोग्य विभागाच्या नेत्र व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत या शिबिराचे आयोजन लातूरच्या परिवहन कार्यालयात करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपागर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक शितल गोसावी, सुनिल खंडागळे, अशोक जाधव, थोरे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसठी परिश्रम घेतले.
शिबिरात नेत्र, रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी तसेच संसर्गजन्य रोगांपासून बचाव आणि तंबाखूमुक्तीसाठी समुपदेशन करण्यात आले. आरोग्य विभागाचे नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ संधीकर, डॉ. दुर्राणी, डॉ कैलास स्वामी, डॉ प्रकाश बेंबरे, डॉ अनिल वाठोरे, डॉ संध्या शेडोळे यांनी शिबिरात सहभागी नागरिकांची तपासणी केली. या शिबिरात १६८ नागरिकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली.
0 Comments