Latest News

6/recent/ticker-posts

तलाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू;लातूर जिल्ह्यात सात उपकेंद्रांवर होणार परीक्षा

तलाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू;लातूर जिल्ह्यात सात उपकेंद्रांवर होणार परीक्षा


लातूर:(जिमाका) महसूल विभागांतील गट-क संवर्गातील तलाठी भरती-2023 अंतर्गत राज्य समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख अतिरिक्त संचालक यांनी 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा आयोजित केली आहे. यासाठी जिल्ह्यात सात उपकेंद्रांवर परीक्षा होणार असून या सर्व परीक्षा केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी विजयककुमार ढगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

लातूरमधील मौजे कोळपा येथील सांदिपनी टेक्निकल कॅम्पस, लातूर येथील स्वामी विवेकानंद इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक कॅम्पस, निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, लातूर येथील ओम साई इन्फोटेक, लातूर येथील नेटीझन्स डिजिटल झोन, लातूर येथील कॉस इंस्टिट्यूट ऑफ कॉम्प्यूटर एज्युकेशन आणि लातूर येथील गुरु ऑनलाईन परीक्षा केंद्र या सात ठिकाणी तलाठी पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी येणार असल्याने परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत सकाळी सात ते सायंकाळी सात या कालवधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.

प्रतिबंधात्मक आदेशामुळे परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील.

परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडुन परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस,  वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासही त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments