शासन आपल्या दारी..!
शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना
कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी..!” हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची ठाणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना जाणून घेवू या लेखातून...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वैयक्तिक लाभधारक शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी सलग, बांधावर व पडजमिनीवर फळझाड, फुलझाडे, मसाला पिके यांच्या लागवडीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येत असून, यामध्ये शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. ही योजना कृषी विभाग, ग्राम विकास विभाग, वनविभाग यांच्यामार्फत राबविली जात असून 0.05 हेक्टर पासून 2 हेक्टर पर्यंत फळबाग लागवडीचा लाभ घेता येतो.
ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याची असून ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर कामास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता कृषी विभागामार्फत देण्यात येऊन फळबाग, वृक्ष, फूलपीक लागवड सुरू केली जाऊ शकते. निवड झालेल्या लाभार्थींना कृषी विभागामार्फत शासकीय फळ रोपवाटिका मधून जातीवंत कलमे, रोपे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच फळबाग लागवडीचे सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये फळझाडे लागवडीसाठी चांगला वाव असून पडजमीन फळबागेच्या लागवडीखाली आल्यामुळे पुढील तीन ते चार वर्षात शेतकऱ्याला शाश्वत उत्पादनाचे साधन तयार होऊ शकते.
पात्र लाभार्थी :- अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या जमाती (Nomadic Tribes), विमुक्त जमाती (De-notified Tribes), दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, भूसुधारक योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती,) कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार- लहान शेतकरी (1 हेक्टर पेक्षा जास्त परंतु 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले) (जमीन मालक व कूळ), सीमांत शेतकरी, सीमांत शेतकरी (1 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी) (जमीन मालक व कूळ),महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉब कार्ड धारक 1 ते 11 प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
अर्ज कुठे करावा :- ग्रामपंचायत कार्यालयात, तसेच प्रत्येक महसूली गावात 24 तास अर्ज टाकता येईल, अशा सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी (उदा. अंगणवाडी शाळा ग्रामपंचायत समाजमंदिर इ.) अर्ज पेटी ठेवण्यात येणार आहे.
अर्ज करण्याचा कालावधी :- अर्ज वर्षभर करता येतो, मात्र दि.15 जुलै ते दि.30 नोव्हेंबर या कालावधीत आलेले अर्ज मंजूर करून त्या वर्षाच्या लेबर बजेट मध्ये समाविष्ट केले जातील.
आवश्यक कागदपत्रे :- 7/12 उतारा, 8अ उतारा, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, जॉब कार्ड, दारिद्रय रेषेखाली असल्यास तो दाखला, जातीचा दाखला किंवा जातीचा उल्लेख असलेली कोणतेही अधिकृत शासनाचे पुरावे (आवश्यकतेनुसार).
योजनेत समाविष्ट फळपिके/वृक्ष/फूलपिके :- 59 प्रकारची फळपिके/वृक्ष- (आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, चिक्कू, जांभूळ, बांबू, साग, शेवगा इ.) फूलपिके - गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा इ. मसाला पिके- लवंग, मिरी, दालचिनी, जायफळ इ. औषधी वनस्पती- बेहडा, हिरडा, रक्तचंदन, करज, शिवण, बेल, आईन, बिब्बा इ.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध असून त्याचा लाभ घेऊन आपल्या जमिनीवर फळझाडाची लागवड करावी. इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या ग्रामपंचायत किंवा कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ठाणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या कोणत्याही कार्यालयाशी संपर्क साधावा व आपल्या पडजमिनीवर आपल्या आवडीनुसार फळबाग लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दीपक कुटे यांनी केले आहे.
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे
0 Comments