‘डोळे येणे’ संसर्गजन्य आजार,असा करा स्वतःचा बचाव !
लातूर:(जिमाका) ‘डोळे येणे’ हा एक विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. विशेषतः पावसाळ्यात हा आजार पसरतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, सूज येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे यासारखी लक्षणे हा आजार झाल्यानंतर दिसून येतात. हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे आजारी व्यक्तींना विलगीकरणात ठेवावे. अशा व्यक्तींनी पूर्ण बरे झाल्याशिवाय इतरांचा संपर्कात जावू नये. ‘डोळे येणे’ पासून वाचण्यासाठी अशी घ्या खबरदारी
डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. डोळ्यांना स्पर्श करून इतर व्यक्तींशी हस्तांदोलन करणे, वस्तूंना स्पर्श करणे, इतर व्यक्तींचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसणे टाळावे. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवावे. हात साबणाने वारंवार धुवावे. गॉगल अथवा चष्मा वापरावा. खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा. नियमितपणे मास्कचा वापर करावा. तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा. माशा, चिलटांमुळे हा संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे खबरदारी घ्यावी. जवळच्या शासकीय दवाखान्यातून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावा. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केले आहे.
0 Comments