Latest News

6/recent/ticker-posts

लंडनच्या संसदेत "सोल ऑफ इंडिया" पुरस्काराने गौरवान्वित वेदप्रकाशचा वर्गमित्रांनी केला सन्मान

लंडनच्या संसदेत "सोल ऑफ इंडिया" पुरस्काराने गौरवान्वित वेदप्रकाशचा वर्गमित्रांनी केला सन्मान


लातूर: येथील व्यंकटेश शाळेत १९९० साली १० वीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या वर्गमित्रांनी एकत्र येत आपल्या कर्तुत्ववान शालेय बालमित्राचा केलेला गौरव सोहळा सध्या लातूरात चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर १७८ शाळेतील बालमित्र आणि मैत्रिणी एकत्र येऊन "भेटी लागे जीवा" हा समूह गेल्या वर्षी (२०२२) तयार करतात. या समूहाच्या माध्यमातून आपल्या शालेय बालमित्रांच्या सुख दुःखात सहभागी होत आपली मैत्री अजून घट्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणजे लातूरात पार पडलेला गौरव सोहळा.

वेदप्रकाश शर्मा या समूहातील असाच एक कर्तबगार विद्यार्थी ज्याने प्रचंड मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर राज्यात, देशातच नव्हे तर अंतरराष्ट्रीय पातळीवर लातूरचे नाव कोरले आहे. यशस्वी उद्योजक आणि सोबतीला सामाजिक कार्याची जोड देऊन 'जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले' हे ब्रीद घेऊन त्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल ब्रिटनच्या संसदेने घेतली. गेल्या ९ जून २०२३ रोजी लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये सोल ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित झालेला वेदप्रकाश याच समूहातील एक अनमोल मोती. एक यशस्वी उद्योजक म्हणून पुण्यात स्थायिक झाला असला तरी आपल्या उद्योगांची व्याप्ती त्याने मुंबई आणि दिल्ली पर्यंत वाढविली आहे. आपल्या विचारांना कृतीची जोड देऊन वेदप्रकाश मार्गक्रमण करीत आहे. आपल्या मिळकतीतील ३० टक्के रक्कम तो समाजातील गरजूंना मदत करण्यात खर्च करतो. हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या युवकांचे समुपदेशन करून त्यांना नवसंजीवनी देण्याचे कार्य संवेदनशील वेदच्या हातून घडत आहे. एवढेच नव्हे तर एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिचे संगोपन करण्याचे अलौकिक कार्य त्याच्या कृतीतून होत आहे.

अशा या कर्तबगार बालमित्राचा गौरव आपल्या लातूर शहरात करण्याचे भेटी लागे जीवाच्या शिलेदारांनी ठरविले. गेल्या १५ जुलै २०२३ रोजी कार्निवल हॉटेलच्या फंक्शन हॉलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात या कर्तुत्ववान मित्राचा आपल्याच वर्ग मित्रांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याची वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळी जवळपास १६० वर्गमित्र आपल्या बालमित्राचा सन्मान करण्यासाठी एकत्र जमले होते. यात विशेष म्हणजे २२ वर्गमैत्रिणी देखील या सोहळ्यासाठी लातूरला आल्या होत्या. डॉक्टर, इंजिनिअर, सी.ए., प्रशासकिय अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक, राजकारणी, व्यापारी अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असलेले राज्यातील विविध ठिकाणाहून आलेले मित्र आणि मैत्रिणी या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते. यावेळी अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तर मित्रांच्या या सत्काराला उत्तर देताना वेद कमालीचा भाऊक झाला होता.

बाल मित्रांनी केलेला हा सत्कार इतर सर्व पुरस्कारापेक्षा मोठा असल्याची भावना व्यक्त केली. या सन्मानाने मला यापुढील काळात जोमाने कार्य करण्याची नवीन ऊर्जा प्राप्त झाल्याचे सांगितले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला आणि पुन्हा एकदा भेटण्याचे आश्वासन देत वर्ग मित्रांनी एकमेकांचा निरोप घेतला. भेटी लागे जीवाच्या या भावस्पर्शी गौरव सोहळ्याने एक नवा लातूर पॅटर्न निर्माण केला आहे यात शंकाच नाही.

Post a Comment

0 Comments