वाहन नियमांचे काटेकोर पालन, वेगमर्यादा आणि नशामुक्त दक्ष चालक अपघात टाळू शकतो- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये
लातूर: खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी चालकांनी वाहन नियमांचे काटेकोर पालन, नशामुक्त, दक्ष राहून सेवा दिल्यास अपघात टाळता येतील असा विश्वास व्यक्त केला. प्रादेशिक परिवहन विभाग, माझं लातूर परिवार आणि जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
खासगी प्रवासी वाहतूक बसचालक, मालक आणि क्लिनर यांच्यासाठी आज लातूरच्या परिवहन कार्यालयात चर्चासत्र, कार्यशाळा तसेच आपत्कालीन परिस्थितीत अग्नीशमन यंत्रणा वापराबाबतचे प्रात्यक्षिक, संकटकाळात बसच्या बाहेर पडण्याचे प्रशिक्षणही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रवाशांना सुरक्षेची हमी आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी वाहन मालक, चालक यांनी यापुढे दक्ष राहून वाहन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन भोये यांनी केले. याप्रसंगी माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनचे सुनिल देशपांडे, जुगलकिशोर तोष्णीवाल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज लोणारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चर्चासत्रात अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. उपस्थित वाहन मालक, चालक यांनीही या चर्चासत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. लातूर महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्यावतीने आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक करून दाखविले.
या कार्यशाळेत जिल्हाभरातील खासगी प्रवासी वाहतूक बसचालक, मालक, क्लिनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं लातूर परिवाराचे सदस्य, जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
0 Comments