खासगी प्रवासी बसचालक, मालक आणि क्लिनर यांच्यासाठी चर्चासत्र आणि कार्यशाळेचे आयोजन
लातूर: प्रादेशिक परिवहन विभाग, माझं लातूर परिवार आणि लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे खासगी प्रवासी वाहतूक बसचालक, मालक आणि क्लिनर यांच्यासाठी चर्चासत्र, कार्यशाळा आणि अग्निशमन यंत्रणा वापराबाबतचे प्रात्यक्षिक होणार आहे.
समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभाग, माझं लातूर परिवार आणि लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत अपघात टाळण्यासाठी घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच लातूर महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चालक, क्लिनर आणि प्रवाशांना अग्निशमन यंत्रणा वापराबाबतचे प्रात्यक्षिक आणि घ्यावयाची काळजी यावर कार्यशाळा घेतली जाणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेस जिल्ह्यातील जास्तीतजास्त खासगी प्रवासी बसचालक, मालक, क्लिनर यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, माझं लातूर परिवार आणि जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व बसचालक, मालक आणि क्लिनर यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
0 Comments