Latest News

6/recent/ticker-posts

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत


मुंबई: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया १२ जून २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत असे आवाहन राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक रमण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

अर्ज नोंदवून झाल्यावर विद्यार्थ्यांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. याठिकाणी विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांची माहिती आणि याबाबत समुपदेशन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय अभ्यासक्रम असून १ लाख ५४ हजार ९३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

विविध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आय टी आय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास बारावी उत्तीर्ण समकक्षता देण्यात येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून रोजगार, स्वयंरोजगार, उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी जास्तीत जास्त दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा असे आवाहन रमण पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments