लातूर तालुक्यात कोतवालांची 15 पदे भरणार; 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार
लातूर:(जिमाका) दि. 21 - महसूल व वन विभागाच्या 17 मे 2023 रोजीचे पत्र आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या सूचनेनुसार लातूर तालुक्यातील कोतवाल पदाच्या रिक्त 19 जागांपैकी 15 जागांची पदभरती राबविण्यात येत आहे. या पदासाठी 24 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत लातूर तहसील कार्यालयात अर्ज वितरण करण्यात येणार असून याच कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. तसेच 20 ऑगस्ट 2023 रोजी तालुकास्तरावर परीक्षा होणार आहे, असे लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी कळविले आहे.
पदभरती होत असलेल्या 15 पदांमध्ये अराखीव 7 पदे असून आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पदे, अनुसूचित जातीसाठी 2 पदे, विजा-असाठी 1 पद, भज-ड साठी 1 पद, विमाप्रसाठी 1 पद, इमावसाठी 1 पद रहिव राहील. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा लातूर तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक असून किमान चौथी पास असावा. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 40 वर्षे असावे. तसेच आरक्षणाच्या नियमानुसार जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. कोतवाल पदासाठी लेखी परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
परीक्षेबाबतची सर्व माहिती लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे श्रीमती नऱ्हे-विरोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments